पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल मेरीट कम मिन्स स्काॅलरशीप’ (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील १ लाख १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ डिसेंबर २०२३ राेजी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७३० केंद्रांवर परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या परीक्षेचा निकाल ७ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी ५ हजार ८६४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर हाेते तर २ लाख ६० हजार ४८८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या यादीत नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादींमध्ये दुरुस्ती करायची असल्यास १६ फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळांच्या लाॅगीनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
काेल्हापूरचे १९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
काेल्हापूर जिल्ह्यांतील २६ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली हाेती. त्यापैकी सर्वाधिक १८ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठाेपाठ पुणे जिल्ह्यातील २२ हजार ५३८ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सातारा जिल्ह्यात १५ हजार २७८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ७९७ आणि नगर जिल्ह्यातील १७ हजार ७५८ पैकी ७ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वार्षिक बारा हजार रुपये मिळणार शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शाेध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ९ वी ते १२ पर्यंत दरमहा १ हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.