पुणे : परदेशात पोलंड येथे वर्क परमिट प्राप्त करुन नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका महिलेने ९ ते १० जणांना १० लाख ५५ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी नाना पेठेतील एका ३१ वर्षांच्या तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ मे २०२१ ते २८ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे नेटवर परदेशात नोकरीच्या संधी शोधत होते. त्यावेळी मयुरी श्रीवास्तव या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला व पोलंड या देशात वर्क परमिट प्राप्त करुन नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच फिर्यादी व इतर ९ ते १० जणांकडून वेळोवेळी १० लाख ५५ हजार ७९१ रुपये घेतले.
त्यापैकी कोणालाही नोकरी न लावता तसेच व्हिसा न देता खोटे ॲग्रिमेंट तयार करुन त्यांना पाठविले व त्यांची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साठे तपास करीत आहेत.