दुर्गेश मोरे
पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एक हजार ३८५ अंगणवड्यांमध्ये अद्यापही वीजजोड नसल्याने भवितव्यच अंधारात गेले आहे. वीजच नाही तर एक हजार २७ अंगणवाड्यात स्वतःचे पाणी कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी मुलांना टाहो फोडवा लागत आहे.
१९८५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यान्वित असून चार हजार ६६९ अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना सेवा दिल्या जातात. याद्वारे बालके, गर्भवती महिला, किशोरवीयन मुली, स्तनदा माता यांसाठी विविध उपक्रम राबिवले जातात. या अंगणवाड्यांमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, तरीही अनेक अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत एक हजार २८ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे मुलांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
जिल्ह्यातील चार हजार ६६९ पैकी एक हजार ३८५ अंगणवाड्यांना स्वत:ची वीजजोड नाही. त्यांना त्वरित वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच वीज वितरण कंपनीबरोबर महिला व बाल कल्याण विभागाची बैठक पार पडली. त्यामध्ये वीजजोड तत्काळ देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये लवकरच वीज उपलब्ध होणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना उंची मापकपट्टी, डिजिटल वजन काटे, लहान बाळाची उंची मोजण्याची पट्टी देण्यात आली आहे. ही सर्व उपकरणे १ जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर
अंगणवाड्यांना बिलाची तरतूद नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ४२८ अंगणवाड्यांना सोलर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या बीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. वास्तविक जिल्ह्यातील तीन हजार ६०० अंगणवाड्यांचे छत सोलर बसवण्यासारखे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी सोलर बसवण्याचा महिला व बाल विकास विभाग प्रयत्न करणार आहे. दरम्यान, २०३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह नसल्याने त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून प्रती अंगणवाडी ४० हजार रुपये ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्या निधीतून या अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एक हजार ३८५ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना तीन हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मीटर, डिपोझिट वगैरेसारख्या गोष्टींवर ही रक्कम खर्च करावयाची आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वीज वितरणशी समन्वय साधत लवकरात लवकर वीजजोड करून घ्यावी. काही अडचण असल्यास महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.
जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.