पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१८ च्या परीक्षेत राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनीच इतरांशी संगनमत करून १ हजार ७०१ अपात्र परीक्षार्थींना पात्र केले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रात ठेवला आहे. सायबर पोलिसांनी बुधवारी टीईटी परीक्षा २०१८ मध्ये १२ आरोपींवर २ हजार ६१५ पानी दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात दाखल केले आहे.
टीईटी २०१८ च्या परीक्षेत राज्यभरात एकूण १ लाख ५७ हजार ६५० परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ९ हजार ६७७ परीक्षार्थी पास झाल्याचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये ८१७ परीक्षार्थी हे अपात्र असतानाही त्यांच्याकडून पैसे स्वीकारून एजंटामार्फत त्यांना पात्र असल्याचे दाखवून त्यांची नावे मुख्य निकालात घुसडण्यात आली होती. हा निकाल वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर त्यात ८८४ परीक्षार्थींना पात्र असल्याचे दाखवून खोटा निकाल जाहीर केला. अशा प्रकारे २०१८ मधील परीक्षेत १ हजार ७०१ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे.
यातील १२ आरोपींवर हे दोषारोपपत्र दाखल केले असून, या गुन्ह्यात आणखी १६ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी २ आरोपींना अन्य गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार २०१९ - २० मधील प्रकरणात सायबर पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध न्यायालयात मंगळवारी दोषारोपपत्र दाखल होते. आरोपींविरुद्ध ३ हजार ९५५ पानी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे.