--
इंदापूर : इंदापूर तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सोळा दिवसात म्हणजेच १ ते १६ एप्रिल दरम्यान, शहरी व ग्रामीण भागातील एकूण १ हजार ८२९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. इंदापूर तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोनाची आकडेवारी अधिक आहे. याला तालुक्यातील निष्काळजी व बेजबाबदार नागरिक कारणीभूत आहेत असे दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यातील आरोग्य, महसूल व सर्वच प्रशासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. विशेषतः नगरपालिका प्रशासन प्रत्येक वार्डात जावून लसीकरण व आरोग्य तपासणीबाबत नागरिकांना जागृत करीत आहे. दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिवस रात्र कष्ट घेत कोरोना बधितांवर उपचार करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांसाठी लागणारे रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची खूप मोठी धावपळ होत आहे. हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने खाजगी आरोग्य विभागही हतबल झाले आहे. त्या इंजेक्शन व्यतिरिक्त इतर औषधी उपचार करून रुग्णांना दिलास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, मात्र मागील सव्वा वर्षात सर्वाधिक रुग्ण शुक्रवार ( दि. १६ ) रोजी आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील १८० तर शहरी भागातील ३३ असे एकूण २१३ रुग्ण एकाच दिवशी आढळवून आल्याने, इंदापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मागील सोळा दिवसात एकूण २२ कोरोना बधितांचा मृत्यु झाला आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, डॉ. विनोद राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका व पुरुष परिचारक यांची टीम दिवसरात्र रुग्णांवर उपचार करत असून, प्रचंड मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात दिवसभर लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांनाही लसीकरण करून देत आहेत. त्यामुळे या आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व टीमचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
______________________________________
कोट १
उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार चालू आहेत.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आपल्याकडे एकूण ८० रुग्ण दाखल करण्यात येतात. दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत असल्याने, आम्ही शर्तीचे प्रयत्न करून ८० पेक्षा अधिक रुग्णांना उपचार देण्याचा प्रयत्न करीत असतो. शासकीय मध्ये रेमडीसीव्हिर इंजेक्शनची कमतरता नाही. रुग्णांना शासनाकडून उत्तम उपचार मिळत आहेत. खाजगी रुग्णालयात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
डॉ. एकनाथ चंदनशिवे - वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर
______________________________________
कोट २
नागरिकांनी शासनाचे नियम तंतोतंत पाळावेत
इंदापूर तालुक्यात आज अखेर ग्रामीण भागात ६७८६ तर शहरी भागात १४०० रुग्ण असे एकूण ८१८६ रुग्ण बाधित झाले असून त्यातील १७४ रुग्ण मयत आहेत. तर आज अखेर ६६५२ रुग्ण बरे करून घरी सोडले आहेत. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून, शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळले पाहिजेत.
अनिल ठोंबरे
प्रभारी तहसिलदार, इंदापूर