भिगवण: कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे स्कूल बसखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) चारच्या सुमारास घडली. यामध्ये स्वराज महेश काशिद (वय १ वर्ष) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताबाबत भिगवण पोलिस स्टेशनला गणेश बबन काशिद यांच्या फिर्यादीवरून बसचालक रोहित हनुमंत पवार (रा. पोंधवडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कूल बस क्रमांक एमएच. ४२, बी. ०१९६ ही कुंभारगाव येथून मुलांना शाळेमधून सोडत असताना गाडी भरधाव वेगात चालवल्याचे समोर आले आहे. गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता तशी गाडी भरधाव वेगात पुढे घेतल्याने समोर स्वराज काशिद हा आल्यावर त्याला धडक बसली. तसेच फरपटत पुढे नेऊन त्याच्या पोटास गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालक फरार झाला होता.