स्टार 1174
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दुष्काळ झाला की अतिवृष्टी, अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर येतो तर चक्रीवादळाचा फटका यामुळे गेल्या चार - पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. यासाठी आतापर्यंत शासनाकडून नियमित अनुदान व नुकसानभरपाई मिळत होती. पण गेल्या दोन वर्षांत शासनाकडे सतत पाठपुरावा करूनदेखील चक्रीवादळाचे दहा कोटी व यंदाचे अतिवृष्टीचे साडेसात कोटी रुपये शासनाकडून आले नाहीत.
गेले चार - पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नियमित येणाऱ्या संकटांमुळे पुरते अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत अतिवृष्टी असो की दुष्काळ शासनाकडून नियमित व संपूर्ण रक्कमेची भरपाई मिळत असे. पण गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळेच शासनाकडून दोन वर्षांपूर्वी चक्रीवादळात नुकसान झालेल्या अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही.
------
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा पाठवला प्रस्ताव
वर्ष प्रस्ताव (कोटीत) मिळाले (कोटीत)
२०१८ ६८५१९१२६ ६८५१९१२६
२०१९ १७२ कोटी ६६ लाख १७२ कोटी २० लाख
२०२० १७८ कोटी ५८ लाख १६८ कोटी ९२ लाख
२०२१ ६ कोटी ५० लाख ५ लाख ३० हजार
----------
पुणे जिल्ह्यात रस्ते, पूल, अंगणवाड्या, शाळांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु, शासनाने त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी चक्रीवादळामुळे घरांच्या झालेल्या पडझडीची नुकसानभरपाई अद्यापही अनेकांना मिळालेली नाही. यामध्ये शासनाकडून ९ कोटी ६६ लाख रुपये येणे अपेक्षित आहे.
------
दोन वर्षे झाले हेलपाटे मारतोय नुकसानभरपाई मिळण्यासाठी
दोन वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळात आमच्या घराचे संपूर्ण छत वाऱ्याने उडून गेले. तलाठ्यांनी पंचनामे केले व शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला. पण अद्याप शासनाकडून एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही.
- अशोक शिंदे, नुकसानग्रस्त
--------