पुणे/किरण शिंदे : पुण्यात 2022 यासारख्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. यातल्या काही घटना आश्वासक तर काही घटना दुःखद होत्या. सरत्या वर्षात पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तर दुसरीकडे आमदार मुक्ता टिळक यांच्यासह अनेक दिग्गजांचे मृत्यू झाले. याशिवाय पुण्यात यावर्षी चर्चा झाली ती नवले पूल अपघाताची. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून एका अतिरेक्याला जेरबंद केले. 2022 मध्ये घडलेल्या अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा...
'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांचे निधन
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे जानेवारी 2022 मध्ये दुःखद निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मानवतेची केवळ भाषा न करता ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभा केलेल्या कामाची मोठी प्रशंसा झाली.
पुणे मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
2022 मध्ये पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वतः नरेंद्र मोदी यांनी तिकीट काढून गरवारे स्टेशन ते आनंदनगर पर्यंतचा प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी मेट्रोची दारे खुली झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 22 हजार पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला
पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण
पुण्यातील ऋतुराज गायकवाड या तरुणाने सरत्या वर्षात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. लखनऊमध्ये झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून ऋतुराज गायकवाडने एक दिवशी क्रिकेट सामन्यात पदार्पण केले. ऋतुराजने यापूर्वी आयपीएल आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी केली.
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे 2022 मध्ये निधन झाले. मृत्युसमयी त्या 57 वर्षांच्या होत्या. मागील अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या होत्या. कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हीलचेअरवर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केलं होतं.
पुण्यात 48 वाहनांचा विचित्र अपघात
सरत्या वर्षात पुण्यात सर्वाधिक चर्चा झाली की नवले पुलाची. मुंबई-बंगळूर महामार्गावर असलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले. अनेकांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले. नोव्हेंबर महिन्यात या पुलावर सर्वात मोठा अपघात झाला. तब्बल 48 वाहने एकमेकांवर धडकली. यानंतर नवले पूल परिसरातील अपघात होणारी ही जागा चर्चेत आली. सातत्याने होणारे अपघात दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला.
चांदणी चौकातील बहुचर्चित उड्डाणपूल पाडण्यात आला
मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. सरत्या वर्षात या उड्डाणपुलाच्या पाडकामाची देशभरात चर्चा झाली होती. एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री स्फोटके लावून हा पूल पाडण्यात आला. अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरू केली होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री बारा वाजल्यानंतर चांदणी चौकातील परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर पिंपरी चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी दलित चळवळीतल्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता.
बजाज समूहाचा आधारस्तंभ हरपला
देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन झाले. ती 83 वर्षाचे होते. निमोनिया मुळे आजारी असलेल्या राहुल बजाज यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे दुःख निधन झाले. त्यांच्या कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीत देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा बहुमान मिळवला. तब्बल 40 वर्षे त्यांनी या उद्योगाचे नेतृत्व केले.
गणपती विसर्जन मिरवणुकीचा रेकॉर्ड ब्रेक
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक 2022 मध्ये तब्बल 29 तास चालली. या विसर्जन मिरवणुकीने नवीन रेकॉर्ड केला. दोन वर्षाच्या कालावधीनंतर 2022 चा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यामुळे गणेश मंडळ आणि पुणेकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे 2022 ची गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 29 तास चालली.
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला पुण्यातून अटक
सरत्या वर्षात दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली. मोहम्मद जुनेद असे या दहशतवादाचे नाव आहे. पुण्यातील दापोडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. दहशतवादी कारवायासाठी नवीन सदस्यांची भरती, आर्थिक पुरवठा ,दारूगोळा आणि शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या कामात सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांचे ब्रेन वॉश करत होता.