पुणे : स्टेप ऑन ग्लोबल कंपनी यामध्ये व्यावसायिक भागीदार असलेल्या एका व्यावसायिकाची कंपनीच्या संचालक असलेल्या दोन महिलांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. कंपनीच्या कामात हेराफेरी करून, वरिष्ठ पदाचा गैरवापर करून बनावट एजंट सोबत संगनमताने, खोटी कागदपत्रे तयार करत तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
देवयानी खरे, प्रांजल गायकवाड, रिलेबल एज्युकेशन त्याचप्रमाणे अब्रोड कॅम्पस नीलोटोपल गोगोई, निर्मली गोगाई, प्रेयोमा गोगाई या आरोपींवर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरण हिंमतराव मोरे (वय-38) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार किरण मोरे, चेतन चुटे आणि आरोपी देवयानी खरे यांनी मिळून स्टेप ऑन ग्लोबल एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सन २०१७ मध्ये स्थापन केली. सदर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक देवयानी खरे व संचालक प्रांजल गायकवाड यांनी मिळून त्यांच्या वरिष्ठ पदाचा गैरवापर करून, बनावट एजंट सोबत संगणमत केले. त्याचप्रमाणे एकत्र येऊन खोटे निवेदन करून डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या संदर्भातील मेल मध्ये फेरफार करून डायरेक्ट विद्यार्थी इन डायरेक्ट दाखवले.
तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकूण दहा लाख रुपये एजंटच्या खात्यावर वळते करून देवयानी खरे व बनावट एजंट यांनी तसेच इतर आरोपींनी तक्रारदार व इतर पदाधिकाऱ्यांची व कंपनीची आर्थिक फसवणूक केली आहे. प्रांजल गायकवाड यांनी कंपनीचा पासवर्ड तक्रारदार यांना विश्वासात न घेता बदलून, तक्रारदार व चेतन चुटे भागीदार हे कंपनीचे अधिकृत संचालक या नात्याने त्यांनी पासवर्डची मागणी केली असता, आरोपी महिलांनी संबंधित पासवर्ड देण्यास नकार देऊन त्यांना कंपनीचे काम करण्यापासून परावृत्त केले आहे.
याप्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर सायबर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करत आहे.