पुणे : सेवा निवृत्तीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविल्यास दरमहा २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून ब्लु चीफ फंडाच्या मॅनेजरने एका ज्येष्ठ नागरिकाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. समाधान श्रीकांत कांबळे (वय ३८, रा. पॉप्युलरनगर, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी रामबाग कॉलनीत राहणार्या एका ८७ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधन कांबळे हे ब्लु चीफ फंडाचे मॅनेजर आहे. त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत सतत संपर्क साधून त्यांच्या घरी येऊन शेअर बाजारात सेवानिवृत्तीचे पैसे गुंतविण्याकरीता विश्वास संपादन केला. दरमहा २० ते २५ तारखेदरम्यान २० हजार रुपये देण्याचे लेखी कबुल केले. त्यांना आमिष दाखवून सेवानिवृत्तीचे मिळालेले १० लाख रुपये चेक स्वरुपात व रोख स्वरुपात घेतले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या मोबदल्यात परताव्याची रक्कम न देता मुद्दलापोटी १० लाख रुपये परत केले नाही. फिर्यादी यांच्या रक्कमेचा अपहार करुन सिक्युरिटी चेक देऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.