पुणे : विवाहाचा आग्रह धरुन अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सौरभ सुपेकर (रा. भवानी पेठ) याला अटक केली आहे.
याबाबत मंगळवार पेठेतील एका २२ वर्षाच्या तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठ, बावधन येथे डिसेंबर २०२० पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सौरभ याने फिर्यादीस वेळोवेळी लग्न करण्याचा आग्रह केला. तिच्याशी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी रजिस्टर विवाह केला. त्यानंतर त्याने संबंधांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करु लागला. तिच्याकडून त्याने १० लाख रुपये उकळले. पीडितेला आपल्या घरी राहण्याची जबरदस्ती केली. तिने नकार दिल्यावर तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. शेवटी तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी सौरभ सुपेकर याला अटक केली आहे.