राजगुरुनगर : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ वाड्याच्या स्मारकासाठी १० कोटींचा निधी तातडीने देण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.हुतात्मा राजगुरू स्मारकाचे काम करण्यासाठी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री गिरीश बापट यांनी विधानभवनात बैठक घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे. खासगी संपादनासह ८२ कोटींचा आराखडा या बैठकीत जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सादर केला. राजगुरुनगर नगर परिषद झाल्याने या आराखड्याला नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देण्याची सूचना अर्थमंत्र्यांनी दिली. तसेच, तातडीने १० कोटींचा निधी अर्थविभाग नगरविकास विभागाकडून जिल्हाधिकारी पुणे यांना देईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार सुरेश गोरे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी सौरव राव, उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे, भाजपा नेते शरद बुट्टे-पाटील,अतुल देशमुख, दिलीप वाळके, काळूराम पिंजण, अमोल पवार, तसेच पुरातत्त्व व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या आराखड्यात लांबून येणाऱ्या लोकांसाठी गेस्ट हाऊस व विद्यार्थ्यांसाठी हॉलचा समावेश करावा, अशी सूचना पालकमंत्री यांनी केली. परिसरातील रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देऊ, असेही सांगितले. यातला काही निधी आताच मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. तर, या ८२ कोटी रु.खर्चाच्या स्मारकाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्यस्तरीय स्वरूपाचा घ्यावा. या वेळी राज्यातील सर्व हुतात्म्याचे गावची माती आणून ती राजगुरू स्मारकाचे पायाभरणीत वापरावी, अशी सूचना अर्थमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना केली. (वार्ताहर)या वाड्याचा जो भाग राजगुरू यांच्या वंशजांच्या ताब्यात होता, त्याचे बरेचसे काम करण्यात आले आहे. जन्मखोली, देवघर आणि सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले आहे. जमीन संपादन, सध्याच्या कामातील उर्वरित काम यासाठी ही रक्कम दिल्याचे गोरे यांनी सांगितले. तसेच राजगुरूवाड्यापासून चांडोलीकडे जाणारा पादचारी साकवाला तत्त्वत: मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राजगुरूवाड्याचा जो भाग खासगी मालकांच्या ताब्यात आहे, त्याचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी आता निधी उपलब्ध झाला आहे.
राजगुरू जन्मस्थळ वाड्याच्या स्मारकासाठी १० कोटी
By admin | Published: April 01, 2016 3:28 AM