विशाल शिर्के पुणे : देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अॅण्ड अॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे. या इंधनाची रक्कम तब्बल ६६८ दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. या वर्षी देखील नोव्हेंबर अखेरीस तब्बल ७ कोटी टन इंधनाचा वापर देशभरात झाला आहे. अमेरिका, चीन, जपान पाठोपाठ भारतात सर्वाधिक इंधनाचे ज्वलन होते. त्यात मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि उद्योगांना लागणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलचा समावेश आहे. देशात दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या २५ कोटींच्या वर आहे. देशात तब्बल ९० दिवसांचा इंधनाचा बफर स्टॉक केला जातो. त्या पद्धतीने इंधनाची आयात केली जाते. देशात २०१५-१६ साली २० कोटी २८ लाख ५० हजार टन क्रूड आॅईल, पेट्रोलची १० लाख १२ हजार आणि डिझेलची १ लाख ७७ हजार टन आयात झाली. तर २०१६-१७मध्ये २१ कोटी ३९ लाख ३२ हजार टन क्रूड आॅईल, ४ लाख ७६ हजार टन पेट्रोल आणि ९ लाख ९६ हजार टन डिझेल आयात करण्यात आले. गेल्या वर्षी देशात पेट्रोल आणि डिझेल मिळून ९ कोटी ९७ लाख ८० हजार टन इंधनाचे ज्वलन झाले. त्यात ७ कोटी ६० लाख १५ हजार टन डिझेल, तर २ कोटी ३७ लाख ६५ हजार टन पेट्रोलचा समावेश होता. एका टनामध्ये तब्बल १० लाख लिटर इंधन सामावते. त्यावरुन इंधन वापराची कल्पना करता येऊ शकते. या वर्षी देखील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पेट्रोलचा १ कोटी ७३ लाख ७० हजार टन आणि डिझेलचा ५ कोटी ३३ लाख ८३ हजार टन वापर झाला आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल मिळून ७ कोटी ७ लाख ५३ हजार टन इंधनाचे ज्वलन अवघ्या आठ महिन्यांत झाले आहे. मे महिन्यात सर्वाधिक डिझेल आणि पेट्रोलचा वापर झाला आहे. या महिन्यांत पेट्रोलचा वापर २४ लाख ३ हजार टन, तर डिझेलचा वापर ७५ लाख २४ हजार टन इतका झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मिळविली आहे. पेट्रोलियम कोक खातेय भाव पेट्रोलियम पदार्थांत पेट्रोल आणि डिझेल वगळता देशात घरगुती वापराचा गॅस आणि औद्योगिक वापरासाठी पेट्रोलियम कोकचा सर्वाधिक वापर होता. त्यातही पेट्रोलियम कोकचा वापर तर पेट्रोलच्या वापरापेक्षा देखील अधिक आहे. पेट्रोलियम कोकचा वापर वीज आणि सीमेंट क्षेत्रात अधिक होतो. एक उत्तम इंधन म्हणून त्याकडे पाहीले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत १ कोटी ७३ लाख ७० हजार टन पेट्रोलचा वापर देशात झाला. त्या तुलनेत पेट्रोलियम कोकचा वापर १ कोटी ७५ लाख ८९ हजार टन इतका झाला. एलपीजी गॅसचा वापर १ कोटी ५२ लाख २४ हजार टन इतका झाला आहे.
२०१६-१७ मधील पेट्रोल-डिझेलचा वापर (रक्कम दशलक्ष डॉलरमध्ये)
पदार्थ | मेट्रीक टन | रक्कम |
पेट्रोल | २३९ | २ कोटी ३७ लाख ६५ हजार |
डिझेल | ४३८ | ७ कोटी ६० लाख १५ हजार |
राज्य | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१६-१७ |
महाराष्ट्र | १,६९,२२,००० | १,८२,२७,००० | १,९३,३३,००० |
गुजरात | १,७६,२५,००० | १,८९,७९,००० | १,८९,६३,००० |
उत्तरप्रदेश | १,३३,४७,००० | १,५०,११,००० | १,५९,२९,००० |
तमिळनाडू | १,२२,१०,००० | १,२६,९८,००० | १,३२,८४,००० |
कर्नाटक | ९,५७,७००० | १,१०,५१,००० | १,१४,५९,००० |
देशातील एकूण वापर | १५,३१,६३,००० | १६,५६,५३,००० | १७,१२,२५,००० |