उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतीला बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे १० लाख रुपये खर्चून आश्रम रोड परिसरात पाणी शुद्ध करण्याचा आरओ फिल्टर प्लांट बसवून देण्यात आला. या यंत्राणेद्वारे केवळ १0 रुपयांत २0 लिटर शुद्ध पाणी जनतेला घरपोच मिळणार आहे.
उद्घाटन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन यांनी केले. आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महत्त्वाचा घटक म्हणून शुद्ध पाण्याचा पुरवठा गरजेचा असताना असे फिल्टर प्लांट उभे करून केली जाणारी सेवा अत्यंत महत्त्वाची आणि लोकोपयोगी अशीच आहे, असे प्रतिपादन कांचन यांनी केले. बडेकरनगर, दत्तवाडी रस्ता (स्मशानभूमी परिसर), खेडेकर मळा व आश्रम रोड या चार ठिकाणी जनतेच्या सोयीसाठी असे फिल्टर प्लांट उभे करून टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी के.जी. कोळी यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बायफचे पाणी समिती प्रकल्प अधिकारी मानसिंग कड म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारातील खेडे सुधारा, भारत सुधारेल ही बांधिलकी जपत बायफ काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शुद्ध पाण्याची सोय करण्याचे काम केल्याचे समाधान वेगळे आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सारिका मुरकुटे, सुनील जगताप, उद्योजक बाळासाहेब मुरकुटे, विजय मुरकुटे, संजय गायकवाड, मिलिंद कांचन, प्रवीण कवडे, अमित कांचन, अमोल कांचन, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते. या यंत्रणेमध्ये ताशी एक हजार लिटर पाणी शुद्धीकरण करणारा आरओ प्लांट, तीन टाक्या, २० लिटर क्षमतेच्या सहाशे बाटल्या, जार, एटीएम मशीन, चिलिंग प्लांट, वॉशिंग मशीन, कपाट, टेबल, खुर्च्या व रिचार्जसाठी मोबाईल सेट व पाणी घरोघरी पोहोचविण्यासाठी चार लाख किमतीचा चारचाकी टेम्पो इत्यादी गोष्टी देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने सुमारे ६ लाख खर्चून यासाठी इमारत शेड बांधली असून पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.