लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या सोसायट्या आणि वाढलेल्या कार यामुळे पार्किंगला जागा नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर सोसायटी बाहेर वाहने पार्क करतात. त्यातून चोरट्यांचे फावत असून कोथरुडमधील अशा रस्त्यावर पार्क केलेल्या १० मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातील कारटेप, साऊंड सिस्टीम असा सुमारे अडीच लाखांचा माल चोरुन नेला. विशेष म्हणजे हे चोरटेही कारमधून चोरी करायला आले होते. एका सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत.
कोथरुडमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील गणंजय सोसायटीसमोर फिर्यादी यांनी आपली मोटार पार्क करुन ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारच्या दरवाजाची काच फोडून नुकसान केले व आतील १५ हजार रुपयांचा कारटेप चोरुन नेला. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याचप्रमाणे चोरट्यांनी या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्या कारमधील कारटेप व सिस्टीम चोरुन नेले आहेत.
या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत असता चोरटे हे कारमधून चोरी करण्यासाठी आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यापूर्वी अशा प्रकारे कारटेपच्या चोर्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या. मध्यंतरी अशा चोऱ्या जवळपास थांबल्या होत्या. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कारटेपची चोरी अनेक महिन्यांनंतर प्रथमच झाली आहे. कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत.