पुणे : दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य पुणेकरांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून शहरात तर सहकारनगर, पद्मावती, आंबेगाव पठार परिसरात पाहायला मिळत आहे. आधी दोन वेळा टोळक्यांनी धुडघूस घालत वाहनांची तोडफोड केली होती. आज पुन्हा तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री 10 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्यानी पुन्हा धुडगूस घालत १० ते १५ वाहनांची तोडफोड केली आहे. त्याबरॊबरच त्या भागातील घरांवरही दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंडानी दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. आता पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारानंतर पोलिसांकडून कारवाई सुरु झाली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी वारजे परिसरात सात गाड्यांची तोडफोड झाली होती. तसेच त्यानंतर सलग दोन दिवस तळजाई परिसरात दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखलही झालीमी होती. त्यावेळी बांधकाम मजूर, पेंटर, पथारी व्यावसायिक, कचरावेचक, रिक्षाचालक, टेंपोचालक अशा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आज पुन्हा तोडफोडीचा प्रकार घडल्याने वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.