लोणी काळभोर : आज महसूल खात्याने अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक आज (दि. १४) कारवाई करून वाळूचे दहा ट्रक पकडले. परंतु, महसूल अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देऊन त्यातील चार चालक ट्रक पळवून नेण्यात यशस्वी ठरले आहेत.पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका येथे अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये उरुळी कांचनचे मंडल अधिकारी समीर शिंगोटे, लोणी काळभोरचे गावकामगार तलाठी व्ही. आर. चिकणे, थेऊरचे गावकामगार तलाठी संतोष चोपदार, मांजरीचे गावकामगार तलाठी मिलिंद सेटे, आळंदी म्हातोबाचीचे गावकामगार तलाठी अशोक शिंदे व त्यांचे सहायक सहभागी झाले होते. या पथकाने सकाळी साडेआठच्या सुमारास कारवाई सुरू केली. साडेअकरापर्यंत त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या दहा वाळूच्या ट्रकवर कारवाई केली. परिवहन खात्याच्या नियमानुसार फक्त दोन ब्रास वाळूवाहतुकीची परवानगी असताना पकडलेल्या प्रत्येक ट्रकमध्ये सुमारे पाच ते साडेपाच ब्रास वाळू आढळून आली. संबंधित चालकाकडे गौणखनिज वाहतुकीबाबत पावती किंवा पास मिळून आला नाही. त्यांच्याकडे रॉयल्टी व दंडाची मागणी केली असता, त्यांनी भरण्यास नकार दिला. हे सर्व ट्रक टोलनाक्यानजीकच्या मोकळ्या मैदानात उभे करून महसूल खात्याचे पथक इतर गाड्याांवर कारवाई करण्यात मग्न असताना या दहापैकी चार ट्रकचालकांनी पथकाची नजर चुकवून गाड्या पळवून नेल्या. पथकाने ट्रक अडवण्याचे प्रयत्न केले; परंतु चालकांनी त्यांना न जुमानता ट्रक सुसाट वेगाने नेले. या चारही ट्रकचे क्रमांक लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आले असून, उर्वरित ६ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. (वार्ताहर)
वाळूचे १0 ट्रक पकडले, चार फरार
By admin | Published: May 16, 2015 4:09 AM