पुणे : "तू मेरी नही हो सकती, तो किसी की भी नही' असे म्हणत विवाहित अल्पवयीन तरूणीवर नायट्रिक अँसिड टाकून जखमी करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
अबुकर अयाज तांबोळी (वय 20, रा. पर्वती दर्शन) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत 17 वर्षे नऊ महिन्याच्या मुलीने दत्तवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. 23 नोव्हेंबर 2029 रोजी पर्वती दर्शन येथील सार्वजनिक शौचालयाजवळ हा प्रकार घडला. पीडित माहेरी गेली होती. त्यावेळी तांबोळी तेथे गेला. त्यावेळी ती "लग्न झाले आहे' असे त्याला समजावून सांगत होती. त्यावेळी हातामध्ये पाठीमागील बाजूस ठेवलेले नायट्रिक अँसिड तिच्या चेहऱ्यावर टाकले. तिचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित फितूर झाली असतानाही शिक्षा
विशेष म्हणजे या प्रकरणात विशेष सरकारी वकील अँड. जावेद खान यांनी तपासलेल्या तेरापैकी 7 साक्षीदार फितूर झाले. फितूर होणाऱ्यांमध्ये पीडित मुलीचाही समावेश होता. मात्र, सरकारी वकिलांनी अँड. खान यांनी घेतलेल्या उलटतपासणीमध्ये तिने सर्व घटना सांगितली. त्याबरोबर वैद्यकीय आणि केमिकल अँनालिसिसचा अहवाल महत्त्वाचा ठरला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सपताळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार किशोर तोंडे, एस.सी.घिसरे आणि कॉन्स्टेबल ओई.सी. खन्ना यांनी मदत केली.