पुणे : प्रसुती प्रक्रियेत तज्ञ व सिझेरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नसतानाही महिलेची प्रसुती करीत तिच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या दोन डॉक्टरांना न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोघा डॉक्टरांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली. या घटनेत राजश्री अनिल जगताप (वय २२) या विवाहितेचा मृत्यु झाला होता. त्यांनी जन्म दिलेली मुलगी सुरक्षित आहे. डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०) आणि सचिन हरी देशपांडे (वय ३९) अशी शिक्षा झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर भूल तज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.याप्रकरणी राजश्री यांचे पती अनिल जगताप यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. डॉ. शिंपी यांचे किवळे परिसरात अथश्री रुग्णालय आहे. डॉ. सचिन देशपांडे हे तेथे काम करत होते. दोघांचे बीएएमएस शिक्षण झाले असून ते सिझरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नाहीत. ३० एप्रिल २०१२ रोजी डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात राजश्री यांना दाखल करण्यात आले होते. सीझर करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राजश्री यांची तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या काळात मोठा रक्तस्त्राव झाल्याने राजश्री यांचा मृत्यु झाला. डॉक्टर प्रसुती प्रक्रियेत तज्ञ व सिझेरियन आपॅरेशन करण्यास सक्षम नसताना त्यांनी निष्काळजीपणे ऑपरेशन केल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. या संवेदनशील खटल्यात सरकारी वकील कावेडिया यांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले़ असे वकील न्यायालयाची संपत्ती आहेत, असे निकाल देताना म्हटले आहे.
निष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 2:38 PM
न्यायालयाने डॉक्टरांना १० वर्षाची सुनावली शिक्षा ; प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावला..
ठळक मुद्देयाप्रकरणी महिलेचे पती अनिल जगताप यांनी देहुरोड पोलिसांकडे दिली होती फिर्याद