पुणे : पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून १०० एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या प्रलंबित मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी शिवतारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुरंदर येथील जागेबाबत पत्र व्यवहार करण्याचे आदेशही त्यांनी दिले असल्याची माहिती बारचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी दिली. उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मण घुले, खजिनदार अॅड. सुदाम कुरकुटे,अॅड.पंजाबराव जाधव, अॅड. बाजीराव झेंडे, अॅड. बाळासाहेब आमले, अॅड. बिपीन पाटोळे, अॅड. पांडुरंग थोरवे, अॅड. प्रशांत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.