: केडगाव येथे जवाहरलाल विद्यालयामध्ये १०० खाटांचा कोरोना पॉझिटिव्ह परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष होत असल्याची माहिती सरपंच अजित शेलार यांनी दिली. आमदार राहुल कुल यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी, दापोडी व वाखारी या चार गावांत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या गावातील लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर, दापोडीच्या सरपंच नंदा भांडवलकर, वाखारीच्या सरपंच शोभा शेळके, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, अप्पासो हंडाळ, राहुल कापरे, धनाजी शेळके, किरण देशमुख, अशोक हंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
नानगाव येथे होणार पन्नास बेडचे कोविड सेंटर-
नानगाव येथील संत निरंकारी भवनमध्ये ५० बेडचे कोविड सेंटर होणार असल्याची माहिती सरपंच स्वप्नाली शेलार व उपसरपंच संदीप खळदकर पाटील यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र नानगाव व ग्रामपंचायत नानगाव यांच्या पुढाकारातून हे सेंटर होणार आहे. या कोविड सेंटरचा लाभ परिसरातील नांनगाव, पारगाव, देलवडी, खोपोडी, गलांडवाडी या गावांना होणार आहे.