विशाल शिर्के -
पुणे :आठ वर्षांच्या मुलाला झालेल्या अतिदुर्मिळ आजारामुळे दोन्ही हात आणि पायाची बोटे जोडलेली... दोन्ही पाय गुडग्यापासून मागे मांडीला चिकटली. त्यावर करावी लागलेली शस्त्रक्रिया.. त्वचेला हात लावली तरी फाटेल अशी स्थिती....कायम जखमा वावरत असलेले शरीर...अशी गंभीर स्थिती असताना देखील औंध रुग्णालयाने त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ५४ टक्के अपंगत्व असल्याची नोंद केल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. त्यानंतर प्रहार संघटनेने आंदोलनही केले. अखेरीस रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाची पुन्हा तपासणी करीत ८० टक्के अपंगत्व असल्याचे सुधारित प्रमाणपत्र दिले असून, पूर्वी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. हर्षल मंगेश कदम (वय ८, रा. रामदासनगर, चिखली) या मुलाला दुर्मिळ एपिडर्मोलिसिस बुलोसा हा जन्मजात आजार झाला आहे. त्याची हाता पायाची बोटे चिकटली असून, हात आणि पाय अगदी काडीसारखे आहेत. त्याला प्रत्यक्ष पाहणेही सामान्य माणसाला असह्य करणारे आहे. साध्या डोळ््यांनी त्याची विदारक स्थिती दिसत असानाही या मुलाला अवघे ५४ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. संबंधित प्रमाणपत्र ३ जानेवारी २०१८ला दिले होते. त्यावर डॉ. एस. व्ही. खिलारे, अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि सिव्हील सर्जन डॉ. आर.के. शेळके यांची स्वाक्षरी होती. दिव्यांग दिनादिवशी (दि. ३) ‘लोकमत’ने ‘जीव टांगणीला, तरी म्हणे ५४ टक्के अपंगत्व’ या मथळ््याखाली वृत्ताला वाचा फोडली होती. त्यानंतर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रमेश पिसे, रामचंद्र तांबे, विद्या तांदळे यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक दिव्यांगांनी आंदोलन केले. ‘दिव्यांगांनी केलेल्या आंदोलनानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने त्वचारोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले. त्यांनी तपासणी करुन संबंधित बालकाला बहुविकलांगत्व असल्याचे निदान केले. त्यानुसार हर्षल याला ८० टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच, केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाºया युनिक डिसअॅबिलिटी आयडीचेही वितरण केल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. ............हर्षलला चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन औंध रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल. -राजेंद्र वाकचौरे, पिंपरी-चिंचवड, प्रहार अपंग क्रांती आंदोलन