पुणे : दोन बँकेतील पाच निष्क्रिय (डॉरमंट) खात्यांतील २१६ कोटी २९ लाख रुपये लंपास करण्याचा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्यानंतर आता या कटाचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडील प्राप्त डेटामधील बँक खाती मुंबई, हरयाणा, चेन्नई व हैदराबाद येथील असल्याचे तपासात समोर आले असून, पाच खात्यांपैकी ज्या निष्क्रिय (डाॅरमंट) खात्यात शंभर कोटी रुपये पडून आहेत, ते खाते हरयाणा येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
देशभरातील नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवल्यानंतर त्याची विक्री करून आर्थिक फसवणूक करण्याची तयारी आरोपींनी केली होती. ज्या बँक खात्यातून आरोपी पैसे इतरत्र वळविणारे होते त्या मोठ्या व्यावसायिक कंपनीच्या पाच खातेधारकांना पुणे पोलिसांचे सायबर गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.१९) लेखी पत्र पाठवत संबंधित बँक खात्याबाबत माहितीची विचारणा केली आहे.
या गुन्ह्यातील आरोपींच्या संपर्कात असलेली स्टॉक ब्रोकर अनघा मोडक ही बँकांच्या डॉरमंट खात्यांची जबाबदारी सांभाळत असलेल्या काही जणांच्या संपर्कात होती. गोपनीय डाटा मिळवून सायबर हॅकरच्या मदतीने संबंधित निष्क्रिय बँक खात्यातील पैसे इतरत्र वळविणे याकरिता ती आर्थिक अडचणीत असलेल्या मोठ्या व्यवसायिकांना संपर्क करत होती. या व्यवहारात तिला कमिशन म्हणून अडीच कोटी रुपये पाहिजे होते व त्यातून तिला तिची कोट्यवधी रुपयांची देणी फेडायची होती. हैदराबाद, सुरत, मुंबई, लातूर, औरंगाबाद या ठिकाणी पुणे पोलिसांची पथके तपासकामी रवाना झाली आहेत. ती संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने मूळ आरोपी हे सतर्क झाले असून, ते फरारी झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचसोबत गुन्ह्यात अटक संशयितांची कार्यालये व घराची झाडाझडती घेतली जात आहे. यावेळी लॅपटॉप, हार्डडिस्क, मोबाइल, पेनड्राइव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे.