पुण्यातील फुले वाड्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी! घोषणा स्वागतार्ह; पण बाबा आढाव म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:57 PM2022-03-11T19:57:57+5:302022-03-11T19:58:28+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या अंदाजपत्रकात १०० कोटी रूपये देत असल्याची घोषणा केली
पुणे : महात्मा फुले स्मारकाच्या, समता भूमीच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने अंदाजपत्रकात घोषणा केलेल्या १०० कोटी रूपयांचे ज्येष्ठ समाजसेवक व महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी स्वागत केले. आता तरतुदही होईल, पण या रकमेचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा व स्मारक मुळ आराखड्यानुसार जनतेसमोर यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गंज पेठेतील महात्मा फुले निवासस्थानाचे आता राष्ट्रीय स्मारक करण्यात आले आहे. या स्मारकाचे बरेच काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याच्या अंदाजपत्रकात १०० कोटी रूपये देत असल्याची घोषणा केली. प्रतिष्ठानचे नितीन पवार तसेच अन्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडूनही या घोषणेचे स्वागत करण्यात आले. यातून आता स्मारक परिसरात सभागृह, माहिती केंद्र तसेच अन्य आवश्यक गोष्टी केल्या जाव्यात असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बाबा आढाव म्हणाले, समता परिषद तसेच आमच्या प्रतिष्ठानकडूनही आम्ही अनेक वर्षे ही मागणी करत होतो. स्मारकाचा मुळ आराखडा प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे, तसेच त्यात आता काही बदलही अपेक्षित आहे. स्मारकाकडे येण्यासाठी साधा चांगला रस्ताही नाही. स्मारकाच्या थोडे पुढे गेले की महापालिकेने सावित्रीबाई फुले यांचे स्मारक केले आहे. त्या व या स्मारकात एक कॉरीडॉर तयार करायला हवा. तसेच त्याच चौकात आणखी पुढे गेले की लहूजी वस्ताद यांची तालीम आहे. त्याचाही समावेश करून या तीनही गोष्टींचे चांगले प्रेरणास्थान तयार व्हावे.