लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेले नवे रुग्ण आढळल्याने येथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २७ प्रवासी आले आहेत. यातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने निष्पन्न झाले असून, या सर्वांचे नमुने जनुकीय रचना तपासणीसाठी एनआयव्हीत पाठवण्यात आले आहेत.
इंग्लंड येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या विषाणूत जनुकीय बदल आढळल्याने हा विषाणू पूर्वीपेक्षा घातक असल्याचा निर्वाळा संशोधकांनी दिला होता. यामुळे पुन्हा नव्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हे धास्तावले होते. यामुळे इंग्लंडहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पुण्यातही आरोग्य विभाग इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवून आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंग्लंडहून जवळपास १ हजार २७ रुग्ण आतापर्यंत आले आहेत. या पैकी ९६८ जणांचा शोध घेण्यात यश आले असून, ८२७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांच्या विषाणूतील जनुकीय रचना बदल तपासण्यासाठी त्याचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आल्या आहेत. इतर १९५ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर न सापडलेल्या ५ जणांचा
शोध घेण्यात येत आहेत. इंग्लंडहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
न सापडलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. इंग्लंडहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
चौकट
बाधितांवर पुण्यातील नायडू, तर पिंपरीतील भोसरी रुग्णालयात उपचार
इंग्लंडहून जिल्ह्यात आलेल्या कोरोनाबाधितांवर नायडू आणि भोसरी रुग्णालयात भरती करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करून १४ दिवसांकरिता विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
चौकट
जिल्ह्यात इंग्लंडवरून आलेले प्रवाशी
कार्यक्षेत्र इंग्लंडहून आलेले प्रवासी शोधलेले प्रवासी तपासणी झालेले कोरोनाबाधित आढळलेले जनुकीय बदल
पुणे मनपा ६७६ ६१९ ५६८ ६ ६
पिं.चिं मनपा २७० २६८ १८८ ६ ६
पुणे ग्रामीण ८१ ८१ ७१ १ १
एकूण १,०२७ ९६८ ८२७ १३ १३
------