पुणे- दिल्लीतील जेएनयु विद्यार्थ्यांच्या वसतिगृह शुल्क वाढीच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, त्याचा देशभरातून जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनातील विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील फी वाढीला विरोध दर्शवला होता. आता, पुणे आणि कोलकाता येथील शासकीय चित्रपट संस्थांमध्येही फी वाढ केल्याचं दिसून येतंय. पुण्यातील विद्यार्थी संघटनेनेही या फीवाढीला विरोध केला आहे.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि कोलकाता येथील सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया यांच्यामार्फत संयुक्तपणे प्रवेश परीक्षा घेतली जाते. मात्र, या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षांसाठी ठेवण्यात आलेल्या फीवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण, सन 2015 मध्ये या परीक्षेसाठी केवळ 2000 रुपये फी घेण्यात येत होती. तर, 2004 मध्ये तीच फी 4000 रुपये करण्यात आली. मात्र, यंदाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात जाहिरात निघाली असून त्यामध्ये फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. संस्थेकडून करण्यात आलेल्या या फीवाढीला एफटीआयआयविद्यार्थी संघटनेने आक्षेप घेत विरोध केला आहे. या संयुक्त कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी 10 हजार रुपये प्रवेश परीक्षा असून केवळ धनदांडगे किंवा ज्यांना 10 हजार रुपये भरता येतील, त्यांच्यासाठीच हा कोर्स असल्याचं विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अधित व्ही सत्वीन यांनी म्हटलंय.
दरम्यान, दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, कॅगच्या अहवालानुसार 2.18 लाख कोटी रुपयांचा फंड शिक्षण व स्वच्छतेसाठी जमा केला आहे, त्याचा वापर न करता हा फंड असाच पडून आहे. हा फंड विद्यापीठात शिकणाऱ्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप, वसतिगृह विकास, पुनर्बांधणी, सफाई व खान कामगारांची मुले, त्यांच्या शिक्षणासाठी वापरावा अशीही मागणी तेथील विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनीही अशीच मागणी करत फी दरवाढीला विरोध केला आहे.