पुणे : कोरोना होऊन गेल्यानंतर काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसचा धोका गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत २०१ हून अधिक रुग्ण म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी दाखल झाले आहेत. दररोज ७-८ नवीन रुग्ण दाखल होत आहेत.
ससूनमध्ये म्युकरमायकोसिसची शंभरावी शस्त्रक्रिया गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली. म्युकरमायकोसिस हा आजार बहुतांश कोविड १९ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. कोरोना काळात दिली जाणारी स्टिरॉइड्स इंजेक्शन, रुग्णाला सहव्याधी आणि कमी प्रतिकारशक्ती असल्यास या बुरशीचा सहजरित्या नाकामधून शरीरामध्ये शिरकाव होतो. बुरशी डोळे व मेंदूमध्ये संसर्ग करते, ज्यामुळे रुग्ण दृष्टी किंवा प्राण गमावू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून बुरशी काढून टाकणे आवश्यक असते. ससूनमध्ये ११ रुग्णांच्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्रक्रिया करण्यात आली आणि ४ रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पू झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली.
बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आल्या. आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची व्यवस्था योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. भारती दासवानी यांच्यातर्फे करण्यात आली. शस्त्रक्रियांसाठी डॉ. मुरलीधर तांबे (अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय), डॉ. अजय तावरे (वैद्यकीय अधिक्षक) व डॉ. विजय जाधव (उपवैद्यकीय अधीक्षक) यांच्याकडून शस्त्रक्रियांचे नियोजन केले जात आहे. या शस्त्रक्रिया डॉ. समीर जोशी (प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान, नाक व घसा शास्त्र विभाग) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहुल तेलंग, डॉ. संजयकुमार सोनावले, डॉ. अफशान शेख, डॉ. किरीट यथाटी, डॉ. चेरी रॉय यांनी पार पाडल्या. शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. संयोगिता नाईक, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. सुरेखा शिंदे व डॉ. शीतल, डॉ. संजीवनी आंबेकर, डॉ. सतीश शितोळे यांच्यातर्फे करण्यात आले. अधिसेविका सुनीता खतगावकर, परिसेविका निर्मला पवार, मार्गारेट जगले, सिद्धार्थ जाधव यांचे योगदान लाभले.