पुणे : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे १०३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून, नऊ जनावरे दगावली आहेत, तर ८३ घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यात तब्बल २० हजार कोंबड्याही दगावल्या आहेत.
जिल्ह्यातील ८ लातुक्यांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव आणि बेल्हा महसूल मंडळात बुधवारी एका दिवसात तब्बल प्रत्येकी ११६ मिमी पावसाचा नोंद झाली, तर जुन्नर, नारायणगाव, राजुरा, डिंगोर, आळेफाटा आणि ओतूर मंडळात ६८ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. खेड तालुक्यातील वाडा, खेड, कुडे, पाईट, कन्हेरसर आणि कडूस मंडळातही ७० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आंबेगावमधील घोडेगाव मंडळात ६६, बारामती तालुक्यातील सुपा मंडळात ७५, इंदापूरमधील काटी आणि केतकी निमगाव मंडळात प्रत्येकी ८८ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात १ ते ८ सप्टेंबरदरम्यान बारामती तालुक्यात ४१ घरांची पडझड झाली असून, दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत, तसेच सुमारे १०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला. जुन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली असून, सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या, ओतूर येथे सहा हजार ६०० आणि पिंपरी पेंढार येथे एक हजार २७५ कोंबड्यांचा मृत्यू झाला. वेल्हा तालुक्यात २६ घरांची पडझड झाली असून, एक जनावर दगावले. पुरंदर तालुक्यातही पावसाचा तडाखा बसला असून, ७ घरांची पडझड झाली. तीन शेळ्या, दोन लहान जनावरे आणि चार हजार कोंबड्या दगावल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.