- नेहा सराफपुणे : १०५ वर्षांच्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांनी आज पुण्यात सकाळी १० वाजता मतदानाचा हक्क बजावला.विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ पासून घेण्यात पहिल्या लोकसभेच्या मतदानापासून ते आज होणाऱ्या १७ व्या लोकसभेपर्यंत दरवेळी मतदान करतात. यावेळी त्यांनी आपल्या आठवणी लोकमतच्या वाचकांशी शेअर केल्या.मंगळवारी( दि. २३) त्यांनी पुण्यातील आर सी एम गुजराथी हायस्कुलमधून मतदान केले.त्यानंतर घाटपांडे म्हणाले की, मी 1952 म्हणजे पहिल्या लोकसभेपासून मतदान करतो. मतदान हा आपला अधिकार आहे, नव्हे कर्तव्य आहे. त्यामुळे ते प्रत्येकाने बजावायलाच हवे.आज आपल्या देशाला नि:स्वार्थी, लोकांसाठी काम करणारा आणि योग्यपणे देश चालवणाऱ्या नेत्याची गरज आहे, त्यामुळे मतदान करायलाच हवे.माझ्या आठवणीत अनेक निवडणुका आहेत. पुण्यात गुप्ते नावाचे वकील उभे असताना त्यांच्यासमोर एक महिला उमेदवार उभ्या होत्या.त्यांनीही उत्तम लढत देत गुप्ते यांना धावपळ करायला लावल्याचे मला आठवते. त्यावेळी या लढतीची चर्चा पुण्यात खूप रंगली होती. हल्ली निवडणूकीचा बदलता पॅटर्न म्हणजे लोकांना त्यातून पैसे हवे आहेत. पूर्वी पैशांची अपेक्षा नसायची पण आता प्रत्येक मेंबर हा पैशांची अपेक्षा करताना दिसतो.अलीकडच्या काळात समाविष्ट झालेला नोटा हा पर्याय नव्याने समाविष्ट झाला आहे. मला हा पर्याय असणे योग्य वाटते कारण उमेदवार नको असला तरी मतदान करण्याचा अधिकार यात बजावता येतो. प्रत्येकाने देशाचा विचार करून मतदान करायलाच हवे.त्याला किंमत न देणे चुकीचे आहे. देश कार्याला मतदान करून सुरुवात करावी.
पहिल्या लोकसभेपासून मतदान करणाऱ्या १०५ वर्षांच्या डॉ घाटपांडे यांनी केले मतदानाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 1:52 PM