लोकमत न्यूज नेकवर्क
पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.
इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊसऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दक्ष राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे, उपपदार्थ सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), उत्तम इंदलकर, राजेश सुरवसे (प्रशासन) या वेळी उपस्थित होते.
इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र, त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे गायकवाड म्हणाले. राज्यात यंदा १०१२ लाख टन उसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.
चौकट
‘जवाहर’चा पहिला नंबर
हातकणंगले (ता. हुपरी, जि. कोल्हापूर) येथील जवाहर कारखान्याने राज्यात सर्वाधिक १८.८८ लाख टन उसाचे गाळप केले. याच कारखान्याने सर्वाधिक ५२८ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी दिले. त्यांच्याकडून २२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजननिर्मिती करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.