पुणे : कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाची अडचण महापालिकेने दूर केली असून २०७ जणांसाठी चार हॉटेल्स आणि दोन संस्थांमधील १०६ खोल्या उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. पालिकेने या हॉटेल्ससोबत करार केला असून या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना आता अन्यत्र निवासाला जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
शहरातल्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह यंत्रणेवरील ताणही कमालीचा वाढला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. रुग्णालयाच्या जवळच निवासाची व्यवस्था करण्याची मागणी या डॉक्टरांनी केली होती. अनेकांना घरी जाणे शक्य नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने विविध रुग्णालये व स्वाब कलेक्शन सेंटरवर काम करणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्या निवासासाठी विविध हॉटेल्ससोबत बोलणी सुरू केली होती. त्यानुसार, आठ रुग्णालये / केंद्रांवरील २०७ वैद्यकीय अधिकरी-कर्मचारी यांची निवास व्यवस्था लावण्यात यश आले आहे.
डॉ.नायडू हॉस्पिटमधील ३३, सिंहगड हॉस्टेल (वडगाव) येथील ५३, कमला नेहरू रुग्णालयातील ३३, सणस मैदान येथील पाच , सोनावणे हॉस्पिटलमधील २८, सिंहगड हॉस्टेल (कोंढवा) येथील ०४, द्रौपदाबाई खेडकर रुग्णालयातील २९ आणि बालवाडीतील निकमार येथील १६ आशा एकूण २०७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले. निवासाची व्यवस्था झाल्याने डॉक्टरांना पुरेसा आराम मिळू शकणार आहे. तसेच त्यांना निवासासाठी लांबवर प्रवास करण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी डॉक्टरांना नाश्ता, एकवेळचे जेवणही दिले जाणार असल्याचे मुठे यांनी सांगितले.
-----------
रुग्णालय वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी हॉटेल खोल्या
डॉ. नायडू हॉस्पिटल - ३३
हॉटेल रिजन्सी २१
सिंहगड हॉस्टेल (वडगाव) ५३
हॉटेल ओंकार एक्झिक्युटिव्ह ३०
कमला नेहरू रुग्णालय ३३
हॉटेल पद्मकृष्ण २२
सणस मैदान ०५
सोनावणे हॉस्पिटलमधील २८
सिंहगड हॉस्टेल (कोंढवा) ०४
हॉटेल विराज ११
द्रौपदाबाई खेडकर २९
वैकुंठभाई मेहता संस्था १४
निकमार, बालेवाडी १६
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स ०८