लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून आश्रमाला येत असलेल्या आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला असल्याचे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल ओशो यांच्या भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आचार्य रजनीश (ओशो) यांचा मोठा आश्रम आहे. या आश्रमाचे व्यवस्थापन व मालकी युरोपातील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनकडे आहे. जगभरच्या ओशोप्रेमींचा येथे राबता असतो. या आश्रमातील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत.या भूखंड खरेदीसाठी तीन मोठ्या उद्योगपतींनी बोली लावली. यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया आणि ए टू झेड ऑनलाइन सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. उद्योगपती राजीव बजाज यांनी तब्बल १०७ कोटी रुपयात हे भूखंड खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.
ओशो आश्रमचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांत विकणार आहेत. मात्र, ही ओशोच्या भक्तांची जागा आहे. जगभरच्या ओशो अनुयायांनी ती निर्माण केली. येथे ओशोंची समाधी आहे. कोविड काळात आश्रम बंद होते. त्यामुळे आश्रमाचा खर्च उचलणे अवघड असल्याने आम्ही भूखंड विकत असल्याचे सांगितले जाते. ओशो आश्रम अडचणीत असेल तर तुम्ही अनुयायांकडे या. ते नक्कीच आर्थिक मदत करतील. - योगेश ठक्कर, ओशो अनुयायी