बारामती : गॅस सिलिंडर ट्रकच्या अपघातातील जखमींवर उपचारासाठी निघालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाच अपघाताला सामारे जावे लागल्याची घटना गुरुवारी (दि. ३) दुपारी चारच्या सुमारास घडली. आपत्कालीन प्रसंगात धावुन जाणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकावरच हा प्रसंग ओढवला.या अपघातामध्ये सुदैवाने हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.गुरुवारी दुपारी उंडवडी कडे पठार येथील वळणावर मद्यपी चालकाचे नियंत्रण न राहिल्याने गॅस सिंलींडर भरुन निघालेला ट्रक (एमएच १२ एफझेड ६७६७) उलटला. हा ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मद्यपी चालकाचे नियंत्रण न राहिल्याने येथील वळणावर ट्रक रस्त्याच्या पुढे जावून चारीत उलटला. या अपघातामध्ये ट्रक चालक अर्जुन लव्हाळे हा किरकोळ जखमी झाला. या अपघातातील जखमीवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. त्यामुळे जखमींवर उपचारासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तातडीने निघाली. मात्र, शहराच्या बाहेर देशमुख चौकातून जात असताना अचानक दुचाकीस्वार समोर आला. दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने तातडीचा ब्रेक दाबला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी जागेवर फिरुन उलटली. अपघाताला कारणीभुत ठरलेला दुचाकीस्वार बचावला. मात्र, हा दुचाकीस्वार घटनास्थळावर न थांबता पसार झाला. अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील डॉ.अशोक डोंबाळे, चालक हेमंत डोंबाळे जखमी झाले. घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात अपघाताबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी सांगितले.
जखमींच्या मदतीसाठी निघालेली ‘१०८ रुग्णवाहिका’ उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:37 PM
गॅस सिलिंडर ट्रकच्या अपघातातील जखमींवर उपचारासाठी निघालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाच अपघाताला सामारे जावे लागल्याची घटना घडली.
ठळक मुद्देडॉक्टरसह चालक जखमी : दुचाकीस्वाराला वाचविताना ब्रेक दाबल्याने अपघात