पुणे : वेगात असलेल्या पीएमपी बसचे स्टिअरिंग तुटल्यामुळे बसवरील नियंत्रण जाऊन बस सर्विस रस्त्यावरील पुलावरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना साेमवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच अाराेग्य विभागाच्या रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केल्याने जखमींना लवकर उपचार मिळू शकले. त्यामुळे सातत्याने रुग्णांच्या मदतीला कमी वेळात पाेहचणाऱ्या 108 क्रमांकावर उपलब्ध हाेणाऱ्या महाराष्ट्र अापत्कालिन अाराेग्य सेवेच्या रुग्णवाहिका अपघातातील जखमींसाठी एकप्रकारे वरदान ठरत अाहेत.
कात्रजहून निगडीकडे जाणाऱ्या 43 क्रमांकाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची साेमवारची सकाळ विदारक ठरली. वेगात असलेल्या या बसचे स्टिअरिंग तुटल्याने बस थेट सर्विस रस्त्यावरील पुलावरुन 20 फूट खाली कंत्राटी कामगारांच्या पत्र्याच्या घरावर काेसळली. या अपघातात 18 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वारजे केंद्राहून एक रुग्णवाहिका 10 मिनिटाच्या अात घटनास्थळी दाखल झाली, त्यानंतर काेथरुड, धायरी, पाैड, पाषाण येथील रुग्णावाहिकाही 15 मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालायत तातडीने दाखल करण्यात अाले. त्यामुळे त्यांना लवकर याेग्य ते उपचार मिळू शकले.
कुठलाही अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने उपचार मिळणे अावश्यक असते. अपघातानंतरच्या गाेल्डन अवर्समध्ये उपचार मिळल्यास जखमी वाचण्याची शक्यता असते. अशावेळी 108 ची रुग्णवाहिका सेवा ही जखमींना लवकर उपचार मिळवून देण्यात महत्त्वाची ठरत अाहे. राज्यात 108 च्या एकूण 937 रुग्णवाहिका अाहेत. यात 233 रुग्णवाहिका या अडव्हान्स लाईफ सपाेर्ट असलेल्या अाहेत तर 704 रुग्णवाहिका या बेसिक लाईफ सपाेर्ट असलेल्या अाहेत. महाराष्ट्रातील सर्व 35 जिल्ह्यांमध्ये ही रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते. जखमींना तातडीची अाराेग्य सेवा मिळणे महत्त्वाचे असल्याचे 108 च्या माध्यम प्रतिनिधी डाॅ. ज्याेत्स्ना माने यांनी सांगितले.