पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेला मंगळवार दि. १६ जुलै पासून सुरूवात हाेणार आहे. दहावीची परीक्षा येत्या ३० जुलै तर बारावीची परीक्षा दि. ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट- २०२४ मध्ये पुरवणी परीक्षेचे आयाेजन केले आहे. सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता व दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळ सत्रात अकरा आणि दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध तसेच छपाई वेळापत्रकच ग्राह्य धरावे असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. फेब्रुवारी- मार्च २०२४ परीक्षेप्रमाणेच जुलै-ऑगस्ट २०२४ पुरवणी परीक्षेमध्ये पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ च्या पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी आदी परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.
पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी
इयत्ता १० वी / इयत्ता १२ वी
मुले : २०३७० / ३६५९०मुली : ८६०५ / २०२५०तृतीयपंथी : ०१ / ०५एकुण : २८९७६ / ५६८४५