मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागातील ९८.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यात कोकण विभागाने अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.७३ टक्के, तर पुणे विभागाची टक्केवारी ९५.६४ टक्के आहे. नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के असा सर्वांत कमी निकाल लागला आहे.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीसाठी ६७ विषयांत आणि आठ माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती.
९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीवराज्यातील ९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यात मुंबई सर्वाधिक ६७, औरंगाबाद २५, नागपूर २ आणि पुणे १ यांचा समावेश आहे, तर ३ विद्यार्थी डिबार ठरले आहेत.
३३,३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटीयंदाच्या दहावीच्या परीक्षेत ८६ हजार ५९४ विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार असून, ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. पुनर्परीक्षार्थी जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले, तरच अकरावीचा अर्ज भरता येणार आहे. मात्र, एटीकेटी राहिलेले विद्यार्थी अकरावीचा अर्ज भरू शकतील
ठाण्याच्या गौतमीला मिळाले १०० टक्के गुण
ठाणे : ठाण्यातील गाैतमी संदीप सहस्रबुद्धे या विद्यार्थिनीने एसएससी बाेर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर नंबरी यश मिळवले आहे. गाैतमीने १०० टक्के गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले आहे. तिचे सर्वच स्तरांतून काैतुक करण्यात येत आहे.
शहरातील बी केबिन परिसरातील ब्राह्मण सोसायटीत राहणारी गौतमी ही ए. के. जोशी शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’मधील विषयांत ४८८ आणि अभ्यासेतर उपक्रमातील १२, असे ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. गौतमीने शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. गौतमीला गायन आणि नृत्यकलेची आवड असून, गायन परीक्षेत तिला १२ गुण मिळाले आहेत.
गौतमीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या पाच आणि कथ्थकच्या पाच परीक्षा दिल्या आहेत. अभ्यास आणि छंद यांची योग्य सांगड घालत तिने हे यश संपादन केले आहे.
नववीपर्यंत अभ्यासाचे जे वेळापत्रक होते तेच दहावीसाठी कायम ठेवले होते, असे तिची आई गौरी यांनी सांगितले. आई- वडिलांबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे गाैतमी हिने सांगितले. दरम्यान, गौतमीची आई गौरी आणि वडील संदीप यांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहे.
‘इंजिनीअर हाेण्याची इच्छा’विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून, भविष्यात इंजिनीअर होण्याची इच्छा आहे, असे गाैतमीने सांगितले. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती; पण १०० टक्के मिळतील, असे वाटले नव्हते, असेही ती म्हणाली.