पुणे : जपानी मेंदूज्वरला (जपानी एन्सेफलायटीस) अर्थात ‘जेई’ ला आळा घालण्यासाठी पुणे शहरातील ० ते १५ वयोगटातील ११ लाख १८ हजार १९६ मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिका आरोग्य विभागाने ठेवले आहे. राज्यातही लसीकरण करण्यात येणार असून त्यापैकी येत्या मार्च महिन्यापासून पुण्यासह रायगड, परभणी या ‘जेई’ प्रभावित जिल्हयांमध्येही याची लस देण्यात येणार आहे. यानंतर या लसीचा समावेश ९ महिने ते दीड वर्षांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या नियमीत लसीकरणात देखील होणार आहे.
मोहिमेअंतर्गत पुणे, रायगड, परभणी या जिल्ह्यांमधील ५० लाख मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहरातील लसीकरणाची मोहिम एक महिना सुरू राहणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागाला लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. पुणे महापालिका आरोग्य विभागाला राज्य सरकारकडून लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यावर मार्चपासून लसीकरण सुरू करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने सांगितले.
या तिन्ही जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी शाळा, अंगणवाड्यामध्येही लसीकरण मोहिम राबविण्यात येईल. मुलांना ०.५ मिलीचा एक डोस देण्यात येणार आहे. याआधी जेई लसीकरणाचा पहिला टप्पा झाला असून त्यामध्ये गोंदिया, गडचिरोली, वर्धा, सोलापूर, भंडारा आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती.
याबाबत अधिक माहीती देताना राज्य कुटुंब कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रवीण वेदपाठक म्हणाले की, डासांच्या मार्फत जेई विषाणूचा प्रसार होतो. जेई विषाणूचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नियोजन सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
काय आहे ‘जेई’?
‘जेई’ हा जपानी मेंदुज्वर असून या रोगाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये विशेष करुन आढळतो. हा विषाणूजन्य आजार आहे तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासांमुळे पसरतो. हे डास पाणथळ जागेत वाढतात. तसेच ताे डुकरे, पाणपक्षी यांच्यामध्येही आढळताे. त्याचा माणसामध्ये प्रसार डुकरांमार्फत हाेताे. सुरुवातीच्या आठवडयात हुडहुडी भरुन ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात. रुग्ण बेशुध्द अवस्थेत जाऊ शकतो. या रोगामुळे प्रामुख्याने लहान मुलांचे मृत्यू जास्त होतात. या आजारामध्ये काही रुग्णांमध्ये मळमळ, डोकेदुखी, ताप, उलटया व कधीकधी वृषणावर सूजही दिसून येते. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम व अपंगत्व इत्यादी परिणाम होऊ शकतात.
पुण्यातील लसीकरणाची तयारी
उद्दिष्ट्ये : ११ लाख १८ हजार १९६
शाळा : ६२५
अंगणवाडी : ९६५
लसीकरणाची सत्रे : २७६६