बारामती (पुणे) :अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी बारामतीतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मुंबईत जाणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ दिवसेंदिवस वाढतच आहे. बारामतीकर कार्यकर्त्यांनी नुकताच ‘अजितदादां’चा त्यांच्या देवगिरी निवासस्थानी जात ११ फुटी सोनचाफ्याचा हार घालून सत्कार केला. सोनचाफ्याच्या फुलांनी केलेला सत्कार बाारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
श्रीकांत जाधव यांनी एका कार्यक्रमात सोनचाफ्याचा हार पहिला, तेव्हापासून तसाच हार मिळावा, यासाठी ते शोध घेत होते; तसेच अजितदादांना सोनचाफा खूप आवडत असल्याने श्रीकांत जाधव यांनी ठाण्यातील त्यांचे नातेवाईक संदीप गायकवाड यांना सोनचाफ्याचा मोठा हार दादांच्या सन्मानासाठी पाहिजे आहे, असे कळविले. त्यांनी मुंबईतील मार्केटमधील एका सुंदर आणि मोठमोठे हार बनविणाऱ्या विक्रेत्यांशी संपर्क करून दिला. सगळीकडे सोनचाफा हार बनवीत नाहीत, त्यासाठी सोनचाफ्याची खूप फुले लागतात आणि ही फुले लवकर मोठ्या प्रमाणत बाजारात उपलब्ध होत नाहीत. इतर हारांच्या तुलनेत हा हार सुंदर, सुगंधी व महागडा असतो; मात्र अजितदादांच्या प्रेमापुढे पैशाचा विषय गौण असल्याचे जाधव यांनी सांगितले. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ व मंडळाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त श्रीकांत जाधव यांनी ११ किलो फुलांचा हार खास माटुंगा येथून ऑर्डर देऊन मध्यरात्रीच बनवून घेतला. श्री. जाधव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी हा ११ फूट लांबीचा सोनचाफ्याचा हार घालून अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला.
हार घेऊन सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी पोहोचले. त्यांनी अजितदादांना हा हार घालून सन्मान केला. देवगिरी बंगल्यावर सोनचाफ्याचा हार जेव्हा बॅगेतून घालण्यासाठी बाहेर काढला. तेव्हा संपूर्ण देवगिरी बंगल्यात त्यांचा सुगंध दरवळला. पवार यांनी या हाराची आवर्जून चौकशी केली. पवार यांचा सन्मान करण्यासाठी श्रीकांत जाधव, संजय गुळवे, मोहन पंजाबी, अभिषेक जाधव, प्रदीप आचार्य आदी उपस्थित होते.
अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले की, सोनचाफ्याच्या सुगंधाप्रमाणेच अजितदादा यांच्या कर्तृत्वाचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळावा, संपूर्ण राज्य आजवर दादांच्या कर्तृत्वाचा अनुभव घेत आले, इथून पुढेही घेईल. दादांच्या धडाकेबाज कामाचा अनुभव सर्वजण घेतील. याबाबत आम्हा बारामतीकरांना खात्री आहे; तसेच लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होतील, ही खात्रीदेखील आहे.