पुणे : शहर पोलिस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाने बालेवाडी परिसरात तीन हॉटेलमध्ये छापेमारी करत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई आणि तर इतर परराज्यातील तब्बल ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे, तर पाच दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रॉकी कदम, राहुल ऊर्फ मदन संन्यासी, दिनेश ऊर्फ मामा, नदीम आणि रोशन यांच्यावर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत शहरातील ऑनलाइन वेश्याव्यवसायासंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा वेश्याव्यवसाय चालवला जात होता. बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. बालेवाडी परिसरात काही हॉटेल आणि सदनिकांमध्ये हा व्यवसाय चालत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने सापळा रचून मिटकॉन महाविद्यालयाजवळील हॉटेल टॅग हाऊस येथे छापा टाकला. तिथे तीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशाच प्रकारे पॅन कार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली, तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, काही मुली एजंटच्या सांगण्यावरून लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत आहेत. यानंतर भरत जाधव यांच्या पथकाने लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ८ मुली मिळून आल्या.
दिल्लीतील गुडगाव आणि नजबगड, उत्तर प्रदेशातील आझमगड, पश्चिम बंगालमधील कोलकत्ता व काशीपूर, आसाममधील लिखापानी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, अंधेरी व वाशी, गुजरात वापी आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथील या मुलींची सुटका करण्यात आली. या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी भोसले, पोलिस अंमलदार सागर केकाण, मनीषा पुकाळे, अजय राणे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.