लोणी काळभोर : येथील बीएसएनएल कंपनीच्या कार्यालयाचे आवारातील भांडारगृहातुन ११ लाख ५३ हजार ९३० रुपये किमतीची १ हजार ५०० मिटर कॉपर केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारत सरकारचे बी. एस. एन. एल मोबाईल कंपनीचे लोणी काळभोर येथील भांडारगृहातील कनिष्ठ दुरसंचार अधिकारी अभिजीत अरविंद खडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील बी. एस. एन. एल च्या भांडारगृहातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात कॉपर केबल व इतर साहीत्य यांचा पुरवठा केला जातो. येथील कार्यालय आवार परीसरात झाडे, वेली वाढलेली असल्याने २० नोव्हेंबर रोजी केरकचरा साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील कार्यालय आवारांत ४६ ड्रम उघड्यावर ठेवलेले होते. त्यातील प्रत्येक ड्रम मध्ये अंदाजे ३६५ मिटर केबल आहे. त्याची मोजणी करीत असताना त्यातील काही ड्रम मध्ये केबल नसल्याचे दिसून आलेने सर्व ड्रम एकत्र करून पाहणी केली असता त्यातील ४ ड्रमची पुर्ण व २ ड्रमची अंदाजे २० मिटर केबल अशी एकुण १ हजार ५०० मीटर केबल चोरीस गेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खडके यांनी सदर बाब वरिष्ठांना कळवली. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेे.
लोणी काळभोर येथे बीएसएनएल कंपनीच्या कार्यालय परिसरातून ११ लाखांच्या केबलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 5:23 PM