पुणे : एनडीए खडकवासला येथे काम करणाऱ्या रेजिमेंटल क्लर्कने गोल मार्केटमधील दुकानांचे भाडे रेजिमेंटल फंडात जमा न करता ११ लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार २०१३ ते २०१९ दरम्यान घडला. या प्रकरणी रेजिमेंटल क्लर्क हेमंत रावल (रा.कोंढवे धावडे) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सीनिअर अकाउंट ऑफिसर (पीएओ) जे.अंजनकुमार यांनी गुरुवारी (दि. २८) उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, फिर्यादी जे.अंजनकुमार हे एनडीए खडकवासला येथे सीनिअर अकाउंट ऑफिसर म्हणून काम करतात. आरोपी हेमंत रावल रेजिमेंटल क्लर्क या पदावर काम करत होता.
हेमंत रावल याने २०१३ ते २०१९ या कालावधीत क्लर्क पदावर काम करत असताना, एनडीए गोल मार्केटमधील दुकानांच्या भाड्याची रक्कम रेजिमेंटल फंडात जमा केली नाही. जमा केलेल्या भाड्याची रक्कम रावल याने स्वत:च्या फायद्यासाठी वापरून ११ लाख ५७८ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चवरे करत आहेत.