पुणे : शेअर बाजारातील ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीत अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला ११ लाख २४ हजारांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाना पेठेत राहणाऱ्या ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने गेल्या वर्षी संपर्क साधला होता. एक्सलेंसा ऑप्शन ऑनलाइन ट्रेंडिग कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतवणूक करण्यास दिली. त्यानंतर त्यांना गुंतवणुकीवर ३५ लाख रुपयांचा नफा मिळाला असल्याचे मेसेज पाठवून सांगितले. त्यातून त्यांना ३ वेळा १ लाख १२ हजार ६२० रुपये पाठविण्यात आले. त्याद्वारे त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना वेेळोवेळी ११ लाख २४ हजार ४३४ रुपये ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सांगितले. त्यानंतर परतावा देण्याचे थांबविण्यात आले. होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम अधिक तपास करीत आहेत.