पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या विवाह विषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्याने लग्नाची मागणी घालून तिला नेदरलँडवरुन शगुन पाठविला. तो सोडवून घेण्याच्या नादात आयटी इंजिनिअर तरुणीला सायबर चोरट्यांनी ११ लाख १६ हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी पासून २४ जून २०२२ पर्यंत घडला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी या आयटी इंजिनिअर आहेत. त्यांनी विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यातून त्यांची नेदरलँड येथील एकाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉटसॲप व्हॉईस कॉलद्वारे संपर्क साधला.
आपण नेदरलँड येथे असून लग्नास तयार आहे. त्यासाठी शगुन पाठविले आहे, असे सांगितले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांना कस्टम असे नाव असलेल्या मोबाईलवरुन फोन आला. तुमचे पार्सल आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी भरायची आहे, असे सांगून वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. फिर्यादी त्याला भुलून पैसे भरत गेल्या. तब्बल ११ लाख १६ हजार रुपये भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करीत आहेत.