पुणे : कानपूर येथे २००६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर भोसरीत झालेल्या दंगलीत सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील ११ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
कानपूर घटनेनंतर पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी दंगली व आंदोलने झाली होती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा निकाल दिला. राजेश अंबिके, किरण वाघमारे, विजय घंगाळे, राजीव राठोड, सुधीर गावणे, प्रदीप लांडगे, संदीप कांबळे, शिवाजी गवळी, नामदेव गवळी, संतोष निर्सगंध आणि अजितकुमार बर्नवाल यांना निर्दोष मुक्त केले. १ डिसेंबर २००६ रोजी पिंपरी-चिंचवड येथील बोपोडी चौकात पीएमपीच्या बसवर दगडफेक झाली होती.
भोसरी एमआयडीसीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्यातील ३६ आरोपींचा समावेश होता. उर्वरित आरोपी फरार असून त्यातील काहींचा मृत्यू झाला आहे. अॅड. सुनील माने आणि अॅड. उमेश गवळी यांनी आरोपींच्यावतीने कामकाज पाहिले.