- किरण शिंदे
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी रात्री मोठी कारवाई केली आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह ११ जणांना ताब्यात घेतले. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली आहे.
गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी तेरा जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. शरद मोहोळचा खून करण्याचा कट अनेक महिन्यांपासून करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक जण सहभागी आहेत. इतकच नाही तर शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता.
5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे. गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.