लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. पोलिसांनी विनवणी करुन कधी वर्दीचा हिसका दाखवून लॉकडाऊन काळात २४ तास बंदाेबस्त केला. या कार्यात पुण्यातील १ अधिकारी आणि १० कर्मचारी हुतात्मा झाला. तसेच दीडशे पोलीस अधिकारी व १ हजार ३३८ कर्मचारी कोरोना बाधित झाले. पोलिसांचे अनेक नातेवाईक कोरोना बाधित झाले होते. या सर्वांना आरोग्य सुविधा पुरविणे, त्यांच्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली.
लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अशावेळी दिवसरात्र बंदोबस्त करुन घरी गेलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला घरात वेगळे करुन घेतले होते.
लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांशी संपर्क वाढल्याने पोलीसांमधील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले. त्याचवेळी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर पाठविता येत नव्हते. अशावेळी बंदोबस्तासाठी मनुष्यबळ कमी पडू लागले. तेव्हा विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडून बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली.
बंदोबस्ताबरोबरच या काळात पोलिसांनी शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांसह काही लाख लोकांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्याची सर्वात मोठी मोहीम राबबिली. परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांची यादी करुन त्यांना प्रत्यक्ष रेल्वे, बसमध्ये बसवून लाखो लोकांची त्यांच्या मुळगावी रवानगी केली.
लसीकरणात आघाडी
पोलीस दलासाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर पुणे पोलिसांनीलसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलीस दलातील ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैरी आतापर्यंत ४६२ पोलीस अधिकारी आणि ५ हजार ६ पोलीस कर्मचारी अशा ५ हजार ४६८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
......
मुलांना पाठविले गावी
कोरोनाचे संकट शहरात घोंगावू लागल्यानंतर मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याची जाणीव पोलीसांना झाली. आपल्यामुळे मुलांना त्रास होऊ नये म्हणून असंख्य पोलीसांनी त्यांच्या मुलांना गावाकडे किंवा सासूसासरे, आईवडिलांकडे पाठवून दिले. काहींची घरी मुले असली तरी काळजावर दगड ठेवून त्यांना महिनोमहिने आपल्यापासून दूर ठेवले होते.