पुणे : मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील ११ कर्मचाऱ्यांना प्रवासी सुरक्षा कायम ठेवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल मानाचा समजला जाणारा जीएम अवॉर्ड (सरव्यवस्थापक पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले. सोमवारी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात कार्यक्रम पार पडला. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी आपली सतर्कता दाखवत संभाव्य अपघात टाळला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. पुणे विभागात रुळांना तडे जाऊन रेल्वेचा अपघात झाला असता. मात्र, कप्तान सिंह बनसकर (किर्लोस्करवाडी) व सुभाष कुमार, ट्रॅक मेंटेनर (रहिमतपूर) यांनी तो वेळीच शोधून प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्याची तत्काळ दखल घेऊन ते दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे त्यांना जीएम अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यासह सोलापूर, मुंबई, नागपूर, भुसावळ विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले. दोन हजार रोख, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अतिरिक्त सरव्यवस्थापक बी. के. दादाभोय, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक सिंह यांच्यासह प्रत्येक विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.