पुणे : धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साेडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके पाणी साेडून देण्यात आले आहे. हे पाणी 4 ते 8 ऑगस्ट या पाच दिवसांमध्येच साेडलेले आहे.
जिल्ह्यातील धरण पाणलाेट क्षेत्रातील पावसाचा सध्या जाेर कमी झाला असून, सध्या खडकवासल्यातून 22 हजार 888 क्सुसेकने पाणी साेडण्यात येत आहे. खडकवासला प्रणालीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येताे. चारही धरणांची पाणी साठवणूक क्षमता 33 टीएमसी असून 29.15 टीएमसी उपयुक्त साठा आहे. खडकवासला धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात यंदा जाेरदार पाऊस झाला. चारही धरणे भरली आहेत.
खडकवासला धरण साखळीतील टेमघरला शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत 123, वरसगाव 65, पानशेत 66 आणि खडकवासला येथे 6 मिलिमीटर पाऊस झाला. तर शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला 3 पानशेत 22, वरसगाव 21 आणि टेमघरला 55 मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. टेमघरमधून 2576, वरसगाव 6,079, पानशेत 4658 क्सुसेकने पाणी खडकवासला धरणात जमा हाेत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सध्या 22,880 क्युसेकने पाणी मुठा नदीत येत आहे. या पावसाळ्यात मुठा नदीमध्ये चारही धरणातील तब्बल 22.34 टीएमसी पाणी साेडण्यात आले असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खडकवासला धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 1.97 टीएमसी आहे. म्हणजे अकराहून अधिक वेळा खडकवासला धरण भरेल इतके हे पाणी आहे.
सर्व पाणी पुढे उजनी धरणात जमा हाेते. याचाच अर्थ उजनी धरणाच्या क्षमतेच्या 16 ते 17 टक्के पाणी खडकवासला प्रणालीतून गेले आहे.