सासवड:पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड जवळील दुभाजक पुलाजवळ लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील लहान मुलाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ओम दत्तात्रय मुकणे (वय ११) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. कार चालक किरण बांगर तसेच मालती दत्तात्रय मुकणे, दत्तात्रेय गोविंद मुकणे, प्रकाश बबन हिलम, संगीत प्रकाश हिलम, पडू महादू दिवे (सर्व राहणारे बिरवाडी, ता-शहापूर ठाणे) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत किरण बबन बांगर यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे-पंढरपूर महामार्गावरील या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. येथील रस्तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. सासवड पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या लक्झरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय मुकणे कारने सासवडवरून जेजुरीकडे देव दर्शनासाठी जात होते. सासवड जवळील एका हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या लक्झरी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कार विरुद्ध दिशेला गेली. त्याच वेळी जेजुरीकडून आलेल्या अन्य चारचाकीची धडक या कारला बसल्याने ओम दत्तात्रय मुकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सहा जण जखमी झाले आहेत.
त्या सर्वांना सासवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे ओम मुकणे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा अपघात अतिशय भीषण होता. धडक झाल्यानंतर कार पलटी झाली. त्यामध्ये बसही विरुद्ध दिशेला गेली होती.