पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..!
By नितीन चौधरी | Published: November 16, 2024 05:37 PM2024-11-16T17:37:53+5:302024-11-16T17:38:45+5:30
बालेकिल्ल्यातच खिंडार : आधी राष्ट्रवादी, मग भाजपने लावला सुरूंग
पुणे : सत्तरच्या दशकात बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात काॅंग्रेसला २००० नंतर उतरती कळा लागली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसला २१ पैकी केवळ दोनच जागा मिळवता आल्या. पाेटनिवडणुकीत कसब्याची जागा मिळवण्यात त्यांना यश आले. जिल्ह्यातील आजवरचा आढावा घेता कॉंग्रेसची राजकीय स्पेस हळू हळू राष्ट्रवादी आणि भाजपने व्यापल्याचे दिसते. १९९९ ला जन्माला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भाजपनेही आपल्या जागा प्रयत्नपूर्वक वाढविल्या आहेत. तर १९५१ ते २०१९ या काळात जिल्ह्यातून २६६ आमदार निवडून आले. त्यापैकी काँग्रेसला ११३ जागा जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी आणि भाजपने ३६, ३६ जागा मिळवल्याचे दिसून येते.
स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश तत्कालीन मुंबई प्रांतात होता. त्यावेळी जिल्ह्यात १३ विधानसभा मतदारसंघ होते. त्यातील तब्बल १२ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर एकट्या मावळ मतदार संघात अपक्षाने बाजी मारली होती. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये १४ पैकी ६ जागा प्रजा समाजवादी पक्षाने पटकावली आणि काँग्रेसला धोबीपछाड दिले होते. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या हाेत्या. तर शेतकरी कामगार पक्ष २, अपक्ष २, भारतीय जन संघ १, हिंदू महासभेला १ जागा मिळाली होती. त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसने आपला प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला. जिल्ह्यातील १६ पैकी तब्बल १५ मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा खेचून घेतले. प्रजा समाजवादी पक्षाला जुन्नरची एकमेव जागा मिळाली होती.
जिल्ह्यात १९६७ मध्येदेखील काँग्रेसने आपला प्रभाव कायम राहत १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. प्रजा समाजवादी पक्षाने शिरूरची, शेतकरी कामगार पक्षाने शिवाजीनगर आणि भारतीय जनसंघाने शुक्रवार पेठची जागा खेचून आणली होती. तर १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसला १३ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाने पुरंदरची जागा, तर भोर आणि आंबेगावची जागा अपक्षांना मिळाली होती. भारतीय जन संघाने २ जागा मिळवल्या होत्या. १९७८ च्या निवडणुकीत जनता पार्टीने काँग्रेसवर मात करत १८ पैकी तब्बल ९ जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. भोर व बोपोडी या दोन मतदारसंघांमध्ये अपक्ष विजयी झाले होते. जनता पार्टीने पुरंदर, दौंड, शिरूर, पुणे कॅन्टोन्मेंट, भवानी पेठ, पर्वती, कसबा पेठ, शिवाजीनगर व हवेली या मतदारसंघांमध्ये विजय मिळवला.
अन् भाजपचा प्रवेश
सन १९८० मध्ये काँग्रेसचे दोन गट झाले आणि अर्स कॉंग्रेसने मुळशी, खेड, आळंदी, जुन्नर, शिरूर, दौंड, बारामती व पुरंदर या ७ जागांवर कब्जा केला; तर काँग्रेसने मावळ, हवेली, पर्वती, भवानी पेठ, इंदापूर व भोर या ७ जागा मिळवल्या. पुणे कॅन्टोन्मेंट व आंबेगाव या दोन जागा जनता पार्टीला मिळाल्या होत्या. भाजपने पहिल्यांदाच जिल्ह्यात शिवाजीनगर व कसबा पेठ या दोन जागा मिळवत जिल्ह्यात चंचूप्रवेश केला होता.
शरद पवारांनी मिळवले गतवैभव
सन १९८५ मध्ये अर्स काँग्रेसचे काँग्रेस एस असे रूपांतर झाले. या निवडणुकीत एस काँग्रेसला जुन्नर, खेड आळंदी, बारामती, बोपोडी, शिरूर व दौंड हे ६ मतदारसंघ मिळाले. तर काँग्रेसला ७ मतदारसंघ जिंकता आले. जनता पार्टीने या निवडणुकीतही आंबेगाव, पुणे कॅन्टॉन्मेंट, पुरंदर हे ३ मतदारसंघ जिंकले. भाजपने शिवाजीनगरची जागा कायम राखली तर भवानी पेठेतून अपक्षाने बाजी मारली. १९९० मध्ये पुन्हा काँग्रेस एकत्र झाल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १८ पैकी तब्बल १४ जागा जिंकत पुन्हा एकदा आपले गतवैभव मिळवले. जनता दलाने एक जागा, तर शिवसेनेने पहिल्यांदाच शिवाजीनगरची जागा आपल्याकडे ओढली. भाजपने कसबा पेठची जागा मिळवली, तर दौंडमध्ये अपक्षाने बाजी मारली होती.
प्रमुख स्थित्यंतरे
- सन १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीने आपला करिष्मा दाखवत जिल्ह्यातील १८ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. त्यात शिवसेनेने पुणे कॅन्टोन्मेंट, भवानी पेठ, जुन्नर, शिवाजीनगर व हवेली हे ५ मतदारसंघ आपल्याकडे खेचले. भाजपने कसबा पेठ, पर्वती व मावळ या तीन मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. इंदापूरमध्ये अपक्ष, तर पुरंदरमध्ये जनता दलाने विजय मिळवला होता.
- राज्यात १९९९ मध्ये काँग्रेसची पुन्हा एकदा शकले उडाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. पहिल्याच निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवत भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड आळंदी, बारामती, दौंड, शिरूर व मुळशी हे मतदारसंघ आपल्याकडे खेचले. शिवसेनेला ३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात भवानी पेठ, हवेली व शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपने कसबा पेठ, पर्वती व मावळ या ३ ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेसला पहिल्यांदाच केवळ बोपोडी व पुणे कॅम्प कॅन्टोन्मेंट या दाेनच जागा मिळाल्या. जनता दलाला पुरंदरची, तर इंदापूरच्या जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
- सन १९९९ चा हा ट्रेंड २००४ मध्येही कायम राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ८ जागा कायम ठेवल्या. तर काँग्रेसने २ जागांवरून ४ जागांवर झेप घेतली. त्यात कॅन्टोन्मेंट व बोपोडी या जागा कायम राखत पर्वती व भोर हे २ मतदारसंघ आपल्याकडे खेचले. शिवसेनेच्या शिवाजीनगर व मुळशी या २ जागा कायम राहून भाजपने कसबा पेठ, मावळ व शिरूर या तीन जागांवर विजय मिळवला. इंदापूरची जागा अपक्षाने आपल्याकडे कायम ठेवली.
- सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा कमी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, बारामती, पिंपरी व वडगाव शेरी या ७ जागा मिळाल्या; तर काँग्रेसला भोर, इंदापूर, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट या ४ जागा मिळाल्या. शिवसेनेची एक जागा वाढून पुरंदर, कोथरूड व हडपसर या तीन जागा मिळाल्या. भाजपने कसबा पेठ व मावळ या जागा कायम राखत शिरूरची जागा गमावली व पर्वती मतदारसंघ आपल्याकडे खेचला. मनसेने या निवडणुकीत जिल्ह्यात पहिल्यांदाच आपले खाते उघडत खडकवासला मतदारसंघातून विजय मिळवला. या निवडणुकीत दौंड, भोसरी व चिंचवडमधून अपक्ष निवडून आले.
- सन २०१४ मध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात आपला मोठा विस्तार केला. या निवडणुकीत भाजपला २१ पैकी तब्बल ११ मतदारसंघांमध्ये विजय मिळाला. त्यात पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, हडपसर, पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी, चिंचवड, मावळ व शिरूर या मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने अतिशय खराब कामगिरी करत केवळ भोर या मतदारसंघात आपले अस्तित्व राखले. शिवसेनेला पुरंदर, खेड आळंदी व पिंपरी या ३ जागा मिळाल्या. मनसेने खडकवासल्याची जागा गमावली मात्र, जुन्नरची जागा खेचली. भोसरीमधून अपक्ष व दौंडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल निवडून आले.
- सन २०१९ मध्ये भाजपच्या दोन जागा कमी होऊन त्यांना केवळ ९ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कामगिरी सुधारत तीनवरून तब्बल दहा जागा मिळवल्या. त्यात शिरूर, जुन्नर, खेड आळंदी, आंबेगाव, इंदापूर, बारामती, मावळ, पिंपरी, वडगाव शेरी व हडपसर या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसला केवळ भोर व पुरंदर या दोन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठची जागा भाजपकडून खेचत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले, तर चिंचवडची जागा भाजपने कायम राखत अश्विनी जगताप निवडून आल्या.
आतापर्यंत झालेले आमदार - २६६
काँग्रेस - ११३
अर्स काँग्रेस - ७
एस काँग्रेस - ६
राष्ट्रवादी काँग्रेस - ३६
प्रजा समाजवादी - ८
भारतीय जनसंघ - ४
हिंदू महासभा - १
शेतकरी कामगार पक्ष - ३
समाजवादी पार्टी - १
जनता पार्टी - १४
भारतीय जनता पक्ष - ३६
जनता दल - ३
शिवसेना - १७
मनसे - २
राष्ट्रीय समाज पक्ष - १
अपक्ष - १६